माझ्या वडिलांनी Kindle वर लिहिलेले मराठी पुस्तक:
(गुरु दत्त यांच्या जीवन आणि काळावरील चरित्रात्मक कादंबरी)Vyasta Odhincha Trikon - व्यस्त ओढींचा त्रिकोण: An Acute Love Triangle - Guru Dutt
अवतरण (Excerpt):
चतुर्दशीचा चंद्र
'एक झलक' ही कथा थोडक्यात अशी होती की एका मोठ्या शहरात दोन मित्र असतात. एक खूप श्रीमंत असतो आणि दुसरा इतका गरीब की आपल्या आर्थिक तंगीमुळे तो आपल्या श्रीमंत मित्राचा कायमचा ऋणी असे. एकदा एका मेळाव्यात श्रीमंत मित्राच्या नजरेला एक अत्यंत संदर तरुणी पडली आणि त्या एका नजरभेटीत तो त्या तरूणीच्या प्रेमात पडतो. पण ही तरुणी गरीब मित्राची धर्मपत्नी असते. अर्थात श्रीमंत मित्राला हे माहित नसते.
घरी परत गेल्यावर गरीब मित्राची सुंदर बायको त्याला त्याच्या श्रीमंत मित्राबरोबर नजरानजर झाल्याचे सांगते. ही घटना तशी किरकोळ आणि नेहमी घडणारी होती. कुणीही अशा भेटलेल्या ओळखीच्या माणसांविषयी घरी माहिती देते, त्यात विशेष असे काहीच नव्हते. पण श्रीमंत मित्र आपल्या गरीब मित्राला ही नजरानजर आणि त्यातून त्याच्या मनात निर्माण झालेली त्या तरुणी बद्दलची अभिलाषा सविस्तर सांगतो. या वेळी त्या गरीब मित्राने ती तरुणी विवाहित असून आपली पत्नी आहे, हे स्पष्ट करायला हवे होते, परंतु तो तसे करीत नाही. उलट गरीब मित्र आपल्या बायकोला घटस्फोट देऊन तिचे लग्न आपल्या श्रीमंत मित्राशी व्हावे अशी योजना करतो. त्याची बायको अर्थात हे धुडकावून लावते.
तरी सुध्दा गरीब मित्र आपल्या श्रीमंत मित्राला वस्तुस्थिती स्पष्ट करीत नाही. तो आपले इच्छापत्र करून त्यात त्याच्या पत्नीने त्याच्या पश्चात श्रीमंत मित्राबरोबर लग्न करावे, अशी तजवीज करून ठेवतो. मग तो आपल्या श्रीमंत मित्राला सांगतो की त्याला आवडलेली तरुणी त्याच्या बरोबर लग्न करण्यास तयार आहे, तेव्हा त्याने बारात घेऊन तिच्या घरी जावे. त्याप्रमाणे श्रीमंत मित्र बारातीची तयारी करतो आणि इकडे गरीब मित्र आत्महत्या करतो. नवऱ्याच्या अचानक मरणाने गरीब मित्राच्या बायकोच्या मनावर इतका मोठा ताण पडतो की तात्काळ हृदय बंद पडून ती मरण पावते. यामुळे बारात घेऊन निघणाऱ्या मित्रावर आपल्या मित्राला आणि त्याच्या बायकोला श्रध्दांजली देण्याचा करूण प्रसंग येतो.
जवळपास सहा वर्षे ही कथा गुरुदत्त फिल्मस् जवळ पडलेली होती. अधून मधून का होईना बऱ्याच वेळा गुरुदत्तचे या कथेच्या विषयावर अब्रार अल्वी बरोबर वाद झाले होते.
“गुरुदत्त! मला सांग या कथेतील दोन मुख्य पात्रे मरतात आणि तिसरे पात्र काहीही न मिळवता मागे जिवंत राहते, या वरून काय तर्कशुध्द अनुमान काढता येईल? प्रेक्षकांना आपण काय देतो? एक निष्कारण घडलेली शोकान्तिका ! याहून दुसरे काय?" अब्रार अल्वी गुरुदत्तला विचारत असे.
अब्रार अल्वी चांगला कसलेला कथा लेखक होता. तेव्हा गुरुदत्तने पुन्हा अब्रार अल्वीला ‘एक झलक' वर विचार करण्याचा आग्रह धरला.
“गुरुदत्त ! ठीक आहे. तुझा हट्टच असेल तर ही कथा आपण थोडी बदलू या. सुंदर तरुणीच्या नवऱ्याने आत्महत्या करण्याऐवजी आपण श्रीमंत मित्राने आत्महत्या केली असे दाखवू या. आपण आपल्या मित्राच्या बायकोची अभिलाषा केली या लाजेने श्रीमंत मित्र मेला, हे दाखविणे काही तरी तर्कसुसंगत दिसेल.” अब्रार अल्वीने गुरुदत्तला आपली कथा सुधाराची योजना थोडक्यात सांगितली होती.
गुरुदत्तने ही सुचना मान्य केली. अब्रार अल्वीने चित्रपट कथा लिहिली. या कथेत जॉनी वॉकर साठी मुद्दाम एक भूमिका सरकवण्यात आली होती. संकल्पित चित्रपटासाठी संवाद तबीश सुलतानपुरी लिहिणार होते. तुलनात्मक दृष्ट्या गरीब असलेल्या नायकाची भूमिका गुरुदत्त करणार होता. त्याच्या सुंदर पत्नीची भूमिका वहिदा रहेमान कडे गेली होती. रहेमान श्रीमंत मित्राची भूमिका निभावणार होता. रवि या चित्रपटाला संगीत देणार होते आणि त्यासाठी सुंदर गीते शकिल बदायुनी यांनी रचली होती.
अब्रार अल्वीने शौकत हुसेन रिझवी यांच्या 'एक झलक' या कथेला पर्यायी म्हणून गुरुदत्त फिल्मस् साठी एक चित्रपट कथा लिहिली होती. ही कथा 'Jade Goddess' या जपानी कथेवर थोडीफार आधारित होती. या गोष्टीचा निर्णायक शेवट शुक्ल पक्षातील चतुर्दशीच्या दिवशी घडत असतो. म्हणून अब्रार अल्वीने या आपल्या पर्यायी कथेला 'चौदहवीका चाँद' हे शीर्षक दिले होते. गुरुदत्तला हे शीर्षक फार आवडले होते. म्हणून त्याने अब्रार अल्वीने नव्याने लिहिलेल्या सुधारित 'एक झलक' चित्रपट कथेला नाव दिले- “चौदहवी का चाँद”
Comments
Post a Comment
Like the post? Leave a message!